धर्मनिरपेक्षता हे संविधानाचे मूलतत्त्व - व्याख्याते पी.डी.पाटील
महापुरुषांना जाती जातीत विभागून त्यांच्या विचाराची माती करू नका - शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील
धरणगाव प्रतिनिधी -- पी डी पाटील
धरणगाव -- तालुक्यातील वंजारी गावात आधुनिक भारताचे शिल्पकार - शिक्षणतज्ञ - विचारवंत - क्रांतीसुर्य - महात्मा ज्योतिराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार - कायदेपंडित - अर्थतज्ञ - बोधिसत्व - महामानव - पुस्तकप्रेमी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच गुरू -शिष्य यांच्या जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय प्रा.सारनाथ साळवे यांनी करून दिला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रमुख व्याख्याते सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष तथा शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील
पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे चिरंजीव विक्रम पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आधुनिक भारताचे शिल्पकार - क्रांतीसूर्य - महात्मा जोतीराव फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह बहुजन महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. बुध्द वंदना घेऊन कार्यक्रमाची मंगलमय वातावरणात सुरवात झाली.
प्रमुख व्याख्याते सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक तथा आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांनी बाबासाहेब व तात्यासाहेब यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. गुरू शिष्यांचे नाते कसे असावे ? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण सर्वांनी महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास वाचणं गरजेचं आहे. महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या जेणेकरून त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करता येईल, असे आवाहन पी.डी.पाटील यांनी केले.
संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष तथा शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले की, बहुजन महापुरुषांचा इतिहास जगण्याची उमेद आणि प्रेरणा देतो. जोपर्यंत आपण आपल्या महापुरुषांना जातीच्या चौकटीतून मुक्त करत नाही तोपर्यंत वैचारिक क्रांती होणार नाही, असे प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र विक्रम पाटील, गावचे सरपंच गणेश महाजन, पोलीस पाटील दिलीप सावळे, गरबड अहिरे, जगन्नाथ पाटील, गोपाल महाजन, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला गावातील महिला, पुरुष, युवक आबालवृद्ध, लहान मुलं - मुली यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिलीप साळवे व आभार प्रदर्शन सरदार वल्लभभाई पटेल शाळेचे मुख्याध्यापक भिकन पाटील केले.
गुरु - शिष्य जयंती महोत्सव यशस्वीतेसाठी बहुजन मित्र मंडळ वंजारी व समस्त वंजारी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.