स्नेहा भारतासाठी एक चमकणारा तारा - उमेश येवले यांचे गौरवोद्गार.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईच्या गिरणगावातील स्नेहा संजय वायकर ह्या मुलीने सांस्कृतिक ऑलिम्पियाड, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील आंतरराष्ट्रीय चेसबॉक्सिंग फेडरेशन (आयएफसी) स्पर्धेत विजय मिळवून इतिहासात आपले नाव कोरले आहे. या अप्रतिम पराक्रमामुळे ती आयएफसी चेसबॉक्सिंग स्पर्धा जिंकणारी पहिली महिला ठरली आहे.
स्नेहाचा चॅम्पियनशिपचा प्रवास सहजसोपा नव्हता. गिरणगावच्या पार्श्वभूमीतून आलेल्या स्नेहाचे यश हे तिच्या कुटुंबाच्या अतूट पाठिंब्याचा पुरावा आहे. दोन्ही मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी तिच्या आईने अर्थात संध्या संजय वायकर यांनी अथक परिश्रम घेतले. स्नेहाचा भाऊ नुकताच परदेशात नोकरीसाठी गेला आहे, तर स्नेहाने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवत असतानाच चेसबॉक्सिंगमध्ये आपल्या कामगिरीने देशाचा गौरव केला आहे.
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा रौप्यपदक जिंकणाऱ्या स्नेहाने चेसबॉक्सिंगमध्ये सातत्याने आपले वर्चस्व दाखवले आहे. तिने आजवर पाच राष्ट्रीय आणि राज्य चॅम्पियनशिपसह फेडरेशन कपमध्ये सर्वोत्तम बॉक्सरचा पुरस्कार मिळवला आहे. स्नेहा एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा अभिमान आहे.
स्नेहाच्या ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी स्नेहाच्या ऐतिहासिक विजयाचा, असामान्य प्रतिभा आणि समर्पणाचा गौरव करण्यासाठी मुंबई सरचिटणीस उमेश येवले, शिवडी तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष इसरार खान, शिवडी तालुका उपाध्यक्ष रवींद्र कदम आणि नवनाथ पाटील तसेच दक्षिण मुंबई सचिव राजेंद्र खानविलकर आदी यावेळी उपस्थित होते.
स्नेहा संजय वायकरचा विजय जागतिक स्तरावर भारतीय प्रतिभेचे दर्शन घडवत असतानाच देशातील महिलांसोबत जगातील महिलांना प्रेरणास्थान ठरत आहे. तिची चिकाटी, जिद्द, खेळाप्रती असलेली निष्ठा आणि चेसबॉक्सिंगची आवड यामुळे महिलांच्या भावी पिढ्यांसाठी क्रीडा क्षेत्रातील एक नवा मार्ग मोकळा झाला आहे. स्नेहा भारतासाठी एक चमकणारा तारा आहे आणि तिच्या यशाचा आम्हांला सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुंबई सरचिटणीस उमेश येवले यांनी याप्रसंगी व्यक्त केले.