मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२४ मध्ये बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रोमांचक सामना रंगला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या संघाला ३१ धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात अनेक विक्रम झाले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएलच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या उभारली. संघाने २० षटकांत ३ गडी गमावून २७७ धावा केल्या. या प्रकरणात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ११ वर्षे जुना विक्रम मोडला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यात मुंबई इंडियन्सला अपयश आले. पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २४६ धावा केल्या.
आयपीएल २०२४ अंतर्गत खेळल्या गेलेल्या या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. दोन्ही डावात एकूण ६९ वेळा चेंडू सीमापार गेला. याआधी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यातही तेवढ्याच वेळा चेंडू सीमापार गेला होता. हा सामना २०१० साली चेन्नईत खेळला गेला होता.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात हार्दिक पंड्याच्या संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी हैदराबादपेक्षा एका डावात अधिक षटकार मारण्याचा विक्रम या संघाने केला. हैदराबादच्या डावात एकूण १८ षटकार तर मुंबईच्या फलंदाजांनी २० षटकार मारले. या बाबतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नाव आघाडीवर आहे, त्यांनी २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध २१ षटकार ठोकले होते. पुरुषांच्या टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार आईपीएल २०२४ च्या आठव्या सामन्यात मारले गेले. या सामन्यात एकूण ३८ षटकार मारले गेले. यापूर्वी २०१८ मध्ये आरसीबी आणि सीएसके यांच्यात झालेल्या सामन्यात ३३ षटकार मारले होते. हा सामना बेंगळुरू येथे झाला होता.
सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने २० षटकांत २४६ धावा केल्या. आयपीएलच्या आठव्या सामन्यात दोन्ही डावात सर्वाधिक धावा झाल्या. दोन्ही संघांच्या एकत्रित ५२३ धावा झाल्या. यापूर्वी सीएसके विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात ४६९ धावा झाल्या होत्या. हा सामना २०१० साली चेन्नईत खेळला गेला होता. आयपीएलच्या इतिहासात दुसर्या डावात २४६/५ करून मुंबई इंडिअन्स संघाने नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. यापूर्वी २०२० साली राजस्थान रॉयल्स संघाने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात शारजाह येथे २२६/६ धावा करून सामना जिंकला होता.
हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी झाली जी शाहबाज अहमदने भेदली. त्याने चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशान किशनला बाद केले, तो १३ चेंडूत ३४ धावा करू शकला. त्याचवेळी रोहित शर्माही पाचव्या षटकात २६ धावा काढून माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला नमन धीरही मागे राहिला नाही. त्याने तिलक वर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची मोठी भागीदारी केली. जयदेव उनाडकटने ही भागीदारी ११व्या षटकात भेदली. ३० धावा करू शकणाऱ्या नमनला त्याने बाद केले.
त्याचवेळी तिलक वर्मा ६४ धावा करून परतला. त्याने दोन चौकार आणि सहा षटकार मारले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्याला विशेष काही करता आले नाही. त्याला २० चेंडूत केवळ २४ धावा करता आल्या. या काळात त्याची धावगती १२० होती. या सामन्यात टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड अनुक्रमे ४२ आणि १५ धावा करून नाबाद राहिले. हैदराबादकडून कर्णधार कमिन्स आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी शाहबाज अहमदला एक यश मिळाले.
प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या सलामीला फलंदाजीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने दमदार कामगिरी केली. त्याने मयंक अग्रवालसोबत पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. अग्रवाल ११ धावा करून तंबूमध्ये परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अभिषेक शर्माने दुसऱ्या विकेटसाठी हेडसोबत ६८ धावांची भागीदारी केली. २४ चेंडूंचा सामना करताना हेडने नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. त्याने १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचवेळी अभिषेक शर्माने तीन चौकार आणि सात षटकार ठोकले. त्याने मुंबईच्या गोलंदाजांना लक्ष्य करत ६३ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीविरुद्धच्या या सामन्यात हैदराबादच्या हेनरिक क्लासेन आणि एडन मार्कराम यांच्यात ११६ धावांची नाबाद भागीदारी करून संघाला २७७ धावांपर्यंत नेले. मार्करामने २८ चेंडूंचा सामना करत ४२ धावा केल्या तर हेनरिक क्लासेनने ३४ चेंडूत २३५.२९ च्या धावगतीने ८० धावा केल्या. या दमदार खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि सात षटकार आले. मुंबईकडून हार्दिक पांड्या, जेराल्ड कोएत्झी आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या विजयासह हैदराबादने गुणतक्त्यामध्ये तिसरे तर मुंबई सलग दोन सामने गमावून नवव्या स्थानावर पोहोचली आहे. अभिषेक शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. गुरुवारी स्पर्धेतील नऊवा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यात सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे होणार आहे. राजस्थान स्पर्धेतला सलग दुसरा विजय मिळवणार का? दिल्ली आपला पहिला सामना जिंकणार का? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सामना नक्की बघा.