मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२४ च्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जवर चार गडी राखून विजय मिळवला. आरसीबीचा या स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत ६ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या ७७ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर आरसीबीने १९.२ षटकांत ६ गडी गमावून १७८ धावा केल्या आणि सामना चार गडी राखून जिंकला. आरसीबी दोन गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे तर पंजाब पाचव्या स्थानावर आहे.
पंजाबने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात पहिल्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी झाली. कागिसो रबाडाने तिसऱ्याच षटकात कर्णधाराला तंबूमध्ये पाठवले. फॅफला केवळ तीन धावा करता आल्या, तर किंग कोहलीने सॅम कुरनविरुद्ध कठोर भूमिका घेत पहिल्याच षटकात चार चौकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कॅमेरून ग्रीनही तीन धावा करून बाद झाला. तर रजत पाटीदार १८ धावा करू शकला. तो ८६ धावांवर हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर बाद झाला. ब्रारचा कहर इथेच थांबला नाही, त्याने ग्लेन मॅक्सवेललाही त्रिफळाचीत बाद केले. संघाला पाचवा धक्का १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीच्या रूपाने बसला. १३० धावांवर हर्षल पटेलने त्याला हरप्रीतकरवी झेलबाद केले. या धडाकेबाज फलंदाजाने ४९ चेंडूंत ११ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७७ धावा काढण्यात यश मिळवले. विराटने टी२० कारकिर्दीतील १०० वे अर्धशतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यानंतर अनुज रावतही तंबूमध्ये परतला. त्याला केवळ ११ धावा करता आल्या.
१७व्या षटकानंतर सामना आरसीबीच्या हातातून निसटत असल्याचे दिसत असताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला दिनेश कार्तिक आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला महिपाल लोमरोर यांनी ४८ धावांची नाबाद भागीदारी केली. संघ विजयाच्या उंबरठ्यावर. संघाला २० व्या षटकात विजयासाठी १० धावांची गरज होती. स्टार फिनिशरने अर्शदीप सिंगविरुद्ध पहिल्या चेंडूवर षटकार मारला, दुसरा चेंडू वाईड गेला आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने शानदार चौकार मारून संघाला पहिला विजय मिळवून दिला. पंजाबकडून हरप्रीत ब्रार आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन तर सॅम कुरन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या सामन्यात पंजाबची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. संघाला पहिला धक्का १७ धावांवर बसला. तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने विराट कोहलीच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्याला केवळ आठ धावा करता आल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला प्रभसिमरन सिंग जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने शिखर धवनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने ही भागीदारी नवव्या षटकात भेदली. २३ वर्षीय फलंदाज १७ चेंडूत २५ धावा करू शकला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला लियाम लिव्हिंगस्टोन १७ धावा करून तंबूमध्ये परतला. १२व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अल्झारी जोसेफने त्याला यष्टिरक्षक अनुज रावतकरवी झेलबाद केले. आश्चर्याची बाब म्हणजे १३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मॅक्सवेलने संघाला मोठा धक्का दिला. त्याने शिखर धवनला ९८ धावांवर बाद केले. कर्णधाराने या सामन्यात पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४५ धावा काढल्या.
विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मंगळवारी चेन्नई विरुद्ध गुजरात सामना रंगणार आहे.