यंदा चेन्नईत रंगणार अंतिम सामना !

आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक जाहीर; अहमदाबादला बाद फेरीच्या दोन लढती.

यंदा चेन्नईत रंगणार अंतिम सामना !


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १७व्या पर्वाचे उर्वरित वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. यंदा चेन्नईतील एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर २६ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना रंगणार असून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'बाद फेरी'च्या (प्ले-ऑफ) दोन लढती खेळवण्यात येतील. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार आता आयपीएलचा पहिला व अंतिम सामना हा गतविजेत्यांच्या मैदानावर खेळवण्यात येतो. त्यामुळे २०२३च्या विजेत्या चेन्नईला हा मान मिळाला आहे.


देशभरात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने २२ फेब्रुवारी रोजी फक्त पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच निवडणुकांच्या तारखा समोर आल्यावर आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आता ८ एप्रिल ते २६ मेपर्यंतचे उर्वरित वेळापत्रक बीसीसीआयने घोषित केले आहे. यापूर्वी सलग दोन हंगामांमध्ये अहमदाबादला अंतिम फेरी झाली होती. तसेच एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामनाही अहमदाबादलाच झाला होता. त्यामुळे काही चाहत्यांनी नाराजीसुद्धा प्रकट केली होती. अखेर यंदा मात्र चेन्नईला अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची संधी देण्यात आली आहे. कोणत्या राज्यात कधी निवडणुका आहेत, हे सर्व लक्षात ठेवूनच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले.


देशांतील १० शहरांत ७० साखळी सामने खेळवण्यात येतील. त्यानंतर बाद फेरीच्या चार असे एकूण ७४ सामने यंदाच्या आयपीएलमध्ये रंगतील. यापूर्वी २०१९मध्ये सुद्धा निवडणुका असताना संपूर्ण आयपीएल भारतात आयोजित करण्यात आली होती. १९ मेपर्यंत साखळी सामने संपतील. २१ मे रोजी क्वालिफायर-१, तर २२ मे रोजी एलिमिनेटर लढत होणार असून हे सामने अहमदाबादला खेळवण्यात येतील. त्यानंतर क्वालिफायर-२ व अंतिम सामना चेपॉकवर रंगणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post