सत्यशोधक पुस्तक चळवळीचा स्थुत्य उपक्रम !
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील
धरणगांव - धरणगाव शहरातील सत्यशोधक पुस्तक चळवळीच्या वतीने मोठा माळीवाडा समाजमढी मध्ये सुरू असलेल्या "ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले अभ्यासिकेला सत्यशोधक राष्ट्रपिता जोतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ११ एप्रिल ला ११ अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी पुस्तकांचे महत्त्व सांगून वाढदिवस, विवाह सोहळा असो की अन्य समारंभ कार्यक्रमाला भेट म्हणून बुके न देता बुक देणे हे गरजेचे आहे. आजच्या युवा पिढीने पुस्तकांशी मैत्री करायला हवी. आजचे युवक हे उद्याचे भविष्य आहेत असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, माहिती अधिकार कायदा महासंघाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी, माळी समाजाचे विश्वस्त गोरख देशमुख, पी डी पाटील, गोपाल माळी, रामचंद्र माळी, कैलास वाघ आदी उपस्थित होते.
माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा दादा माळी यांच्या शुभहस्ते अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना ही अनमोल ग्रंथ भेट देण्यात आली. अभ्यासासोबत संत-महापुरुषांचे विचार देखील प्रेरणादायी आहेत. पुस्तके हे मस्तक घडवीत असतात आणि घडलेले मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही. म्हणून वाचाल तर वाचाल असे प्रतिपादन आबासाहेब वाघ यांनी केले.
याप्रसंगी अभ्यासिकेतील ट्रेनर निवृत्ती महाजन, वासुदेव महाजन, जयेश महाजन, योगेश महाजन, दिनेश पाटील, सुयोग चौधरी, राहुल महाजन, गौरव झुंजारराव, विष्णु तायडे, सतिष महाजन, विक्की वारुळे आदी विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, पी डी पाटील यांनी सत्यशोधक पुस्तक चळवळ सुरू करून शहरात पुस्तक वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आज आपण वाचनाबद्दल विचार केल्यास जेवढे ही महापुरुष झाले ते वाचण्यातूनच समोर आलेले आहेत. त्यात राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, शहीद भगतसिंग, महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर, प्र.के.अत्रे अशी अनेक नावे प्रामुख्याने घेता येईल. या उपक्रमाचे मी स्वागत करतो असे विठोबा माळी म्हणाले. पुस्तक भेट कार्यक्रमाचे आभार जयेश महाजन यांनी मानले.