मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२४ च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा २० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ४ गडी गमावून १९३ धावा केल्या. संजू सॅमसनने ८२ धावांची नाबाद खेळी खेळली. प्रत्युत्तरात लखनौचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १७३ धावा करू शकला. केएल राहुल आणि निकोलस पुरण यांची अर्धशतके व्यर्थ गेली. राहुल ५८ धावा करून बाद झाला, तर पुरण ६४ धावा करून नाबाद राहिला. लखनौला शेवटच्या सहा चेंडूंवर विजयासाठी २७ धावांची गरज होती, पण संघाला केवळ सहा धावा करता आल्या. त्यावेळी निकोलस पुरण आणि कृणाल पंड्या खेळपट्टीवर होते. आवेश खान गोलंदाजीसाठी आला होता, जो गेल्या मोसमात लखनौकडून खेळला होता. मात्र, त्याने आपल्या जुन्या संघाला केवळ सहा धावा करू दिल्या.
या विजयासह राजस्थानचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांचे दोन गुण आहेत. तथापि, ते नेट रन रेटमध्ये चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्सपेक्षा वर आहेत. राजस्थानचा संघ आता २८ मार्चला दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. लखनौचा संघ ३० मार्चला पंजाब किंग्जशी भिडणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान संघाची सुरुवात खराब झाली. जोस बटलर ११ धावा करून बाद झाला तर यशस्वी जैस्वाल २४ धावा करून बाद झाला. यानंतर सॅमसनने रियान परागसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. राजस्थानला १४२ धावांवर तिसरा धक्का बसला. परागचे अर्धशतक हुकले आणि २९ चेंडूत ४३ धावा करून तो बाद झाला. या खेळीत त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. शिमरॉन हेटमायर पाच धावा करून बाद झाला.
दरम्यान, सॅमसनने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील २१ वे अर्धशतक ३३ चेंडूत पूर्ण केले. त्याने जुरेलसोबत पाचव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. शेवटच्या पाच षटकांत राजस्थानने ५० धावा केल्या आणि एक विकेट गमावली. सॅमसनने ८२ धावांच्या खेळीत तीन चौकार आणि सहा षटकार मारले. त्याचवेळी ज्युरेलने २० धावांच्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार ठोकला. लखनौकडून नवीन उल हकने दोन बळी घेतले. तर मोहसीन खान आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
१९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौ संघाची सुरुवात खराब झाली. संघाने ११ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. क्विंटन डी कॉक (४) आणि देवदत्त पडिक्कल (०) यांना ट्रेंट बोल्टने तंबूमध्ये पाठवले. त्याचवेळी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या नांद्रे बर्जरने आयुष बडोनीला (१) बाद केले. यानंतर कर्णधार केएल राहुलने चौथ्या विकेटसाठी दीपक हुडा (इम्पॅक्ट प्लेअर) सोबत ४९ धावांची भागीदारी केली. मोठ्या फटकाच्या नादात हुडाची विकेट गेली. तो १३ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २६ धावा करून बाद झाला.
यानंतर राहुलने निकोलस पुरनसोबत ५२ चेंडूत ८५ धावांची भागीदारी केली. राहुलने आयपीएल कारकिर्दीतील ३४ वे अर्धशतक झळकावले. मात्र, त्यानंतर तो लगेचच बाद झाला. त्याला ध्रुव जुरेलच्या हाती संदीप शर्माने झेलबाद केले. राहुलने ४४ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. मार्कस स्टॉइनिस तीन धावा करून बाद झाला. तर पूरनने अर्धशतक झळकावले पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. पुरणने ४१ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. क्रुणाल तीन धावा करून नाबाद राहिला. राजस्थानकडून बोल्टने दोन बळी घेतले. तर बर्गर, अश्विन, चहल आणि संदीप यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.